‘ग्रामीण वार्ता’च्या वृत्ताची तात्काळ दखल; नाचणे मार्गावरील धोकादायक केबल्स दोन दिवसांत सुरक्षित, नागरिकांकडून समाधान

Gramin Varta
200 Views

रत्नागिरी/अजय सावंत: शहरातील प्रमुख रस्त्यांवरील विद्युत खांबांवर धोकादायक पद्धतीने लोंबकळणाऱ्या केबल्सबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घेत अवघ्या दोन दिवसांत आवश्यक उपाययोजना केली. अनेक ठिकाणी विद्युत खांबांवरील केबल्स सुरक्षितपणे बांधण्यात आल्याने संभाव्य अपघाताचा धोका कमी झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील विविध भागांमध्ये तसेच प्रमुख रस्त्यांवर खासगी ब्रॉडबँड व केबल नेटवर्कच्या तारा निष्काळजीपणे लटकलेल्या होत्या. काही ठिकाणी एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीपर्यंत टाकण्यात आलेल्या केबल्स योग्य प्रकारे सुरक्षित न बांधल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

या गंभीर समस्येकडे ‘ग्रामीण वार्ता’ने वृत्तातून लक्ष वेधले होते. त्यानंतर संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करत विद्युत खांबांवरील लोंबकळणाऱ्या केबल्स व्यवस्थित बांधण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे नागरिकांनी या कार्यवाहीचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

मात्र, नाचणेकडून शहराकडे जाणाऱ्या मार्गावरील काही केबल्स सुरक्षित करण्यात आल्या असल्या तरी साळवी स्टॉप ते मारुती मंदिर या मुख्य मार्गावर अजूनही काही ठिकाणी केबल्स धोकादायक अवस्थेत लटकताना दिसत आहेत. त्यामुळे उर्वरित भागातील केबल्सही तातडीने सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडल्यानंतर प्रशासनाकडून त्वरित दखल घेतली जाऊ शकते, याचे हे उदाहरण ठरले आहे. स्थानिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ‘ग्रामीण वार्ता’च्या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Total Visitors :
4618082
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *