मुंबई: राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोवा भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर तसेच अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
४ ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. तर ५ ऑगस्ट रोजी बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. १ जुलै ते ३१ जुलैदरम्यान राज्यात सरासरी ३२४.२ मिलीमीटर पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ४५४.२ मिलीमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ७२ टक्के अधिक पाऊस झाला असून कोकणात ३३ टक्के, विदर्भात २१ टक्के आणि मराठवाड्यात १७ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशभरात मान्सूनचा वेग काहीसा कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता असून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. १५ ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, नदी-नाले तसेच धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Leave a Comment





