राजापूरचा सुपुत्र ठरला देवदूत; भिवंडीतील इमारत दुर्घटनेत सहाय्यक आयुक्त अरविंद धुगरे यांचे धाडसी पाऊल

Gramin Varta
165 Views

राजापूर : भिवंडी येथे ३१ जुलै रोजी झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत राजापूरचा सुपुत्र तथा भिवंडी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद धुगरे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळल्याची घटना समोर आली आहे. इमारत कोसळण्याच्या अवघ्या दहा मिनिटे आधी त्यांनी स्वतः इमारतीत जाऊन रहिवाशांना बाहेर काढल्याने अनेक कुटुंबांचे प्राण वाचले.

राजापूर शहरातील आंबेवाडी येथील रहिवासी असलेले अरविंद धुगरे सध्या भिवंडी महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ३१ जुलै रोजी सायंकाळी इमारतीला मोठे तडे गेल्याची माहिती स्थानिक नगरसेवक यशवंत टावरे यांनी धुगरे यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

धोक्याची पर्वा न करता धुगरे स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत गेले आणि रहिवाशांना तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यांनी नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. त्यांच्या सूचनेनुसार अनेक कुटुंबांनी तत्काळ इमारत रिकामी केली.

धुगरे आणि सर्व रहिवासी बाहेर पडल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत इमारत कोसळली. त्यांच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे शेकडो नागरिकांचे प्राण वाचल्याची भावना व्यक्त होत असून परिसरातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या धाडसी कार्याचे कौतुक केले आहे.

इमारत दुर्घटनेनंतरही अरविंद धुगरे हे दिवसभर घटनास्थळी उपस्थित राहून बचाव व मदतकार्याचा आढावा घेत होते. या घटनेमुळे संकटकाळात प्रशासनाच्या सतर्कतेचे आणि तातडीच्या निर्णयक्षमतेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. राजापूरच्या या सुपुत्राने दाखविलेल्या धाडसाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Total Visitors :
4630199
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *