खाकीचं स्वप्न अधुरंच राहिलं… पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या शुभमला काळाने वाटेतच गाठलं

Gramin Varta
465 Views

चंदगड : अंगावर खाकी वर्दी चढवून समाजसेवेची शपथ घेण्याचं स्वप्न त्याने मनापासून जपलं होतं. पहाटेचा सराव, घाम गाळत केलेली मेहनत आणि पोलिस दलात दाखल होण्याची जिद्द… पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एका भीषण अपघाताने अवघ्या २१ वर्षीय शुभम डेगवेकरचा जीवनप्रवास कायमचा थांबला आणि त्याच्यासोबत खाकी वर्दीचं स्वप्नही अधुरंच राहिलं.

चंदगड तालुक्यातील वाळकोली फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शुभम डेगवेकर (वय २१, रा. सोनावल) याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेने सोनावल गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, एका होतकरू तरुणाच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम शनिवारी दुचाकीवरून चंदगड तालुक्यात गेला होता. वाळकोली फाट्याजवळ समोरील टेम्पोला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की, शुभमचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चंदगड पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

शुभम हा पोलिस भरतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून कठोर परिश्रम घेत होता. कुडाळ येथील प्रशिक्षण केंद्रात तो नियमित भरतीपूर्व प्रशिक्षण घेत होता. मैदानी सराव, शारीरिक तंदुरुस्ती आणि लेखी परीक्षेची तयारी करत एक दिवस खाकी वर्दी परिधान करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र, नियतीने एका क्षणात त्याच्या आयुष्याचं पानच उलटलं.

शुभमच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडील, बहीण आणि आप्तस्वकीयांच्या डोळ्यांत आजही त्याच्या यशाची स्वप्ने आहेत; मात्र त्या स्वप्नांना आता कायमची विरामचिन्हे मिळाली आहेत. सोनावल गावात सर्वत्र शोककळा पसरली असून, अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

जिद्द, मेहनत आणि खाकीची ओढ घेऊन धावणारा एक तरुण… नियतीच्या एका क्षणाने सर्व काही हिरावून नेलं. शुभमची कहाणी आज अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात एकच प्रश्न सोडून गेली आहे-स्वप्नांचा प्रवास इतका अल्प का ठरतो?

Total Visitors :
4630053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *