भिवंडी : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी फ्लॅट पाहायला निघालेल्या एका महिलेचा प्रवास नियतीने अर्ध्यावरच संपवला. ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात स्कुटर घसरली आणि मागून येणाऱ्या भरधाव ट्रकखाली सापडून ४६ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पुन्हा एकदा निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील मनोरमानगर परिसरात राहणाऱ्या सुनिता अक्षयलाल पाल (वय ४६) या आपल्या पती अक्षयलाल पाल यांच्यासोबत रविवारी भिवंडीतील अंजूर फाटा परिसरात फ्लॅट पाहण्यासाठी ॲक्टिवा दुचाकीवरून निघाल्या होत्या. राहणाळ गावाच्या हद्दीत पोहोचताच रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, दुचाकीचा तोल जाऊन दोघेही रस्त्यावर कोसळले.
क्षणाचाही अवधी न मिळता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने सुनिता पाल यांना चिरडले. ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती अक्षयलाल पाल यांच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या भीषण दुर्घटनेने उपस्थित नागरिकही हादरून गेले.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ ट्रक थांबवून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सुनिता पाल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी नारपोली पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, ठाणे-भिवंडी मार्गावरील खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे सातत्याने अपघात घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विकासाच्या घोषणा होत असताना सुरक्षित रस्त्यांचा प्रश्न मात्र कायमच दुर्लक्षित राहत असल्याची भावना व्यक्त होत असून, या दुर्घटनेनंतर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
“फ्लॅट पाहायला निघालेली सुनिता घरी परतलीच नाही…”
घराच्या स्वप्नांसाठी सुरू झालेला प्रवास एका क्षणात अंत्ययात्रेत बदलला. रस्त्यावरील एका खड्ड्याने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला आणि अनेक अनुत्तरित प्रश्न मागे ठेवले.





