रत्नागिरीत १.८५ लाखांच्या मच्छीमारीच्या जाळ्यांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
157 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील राजीवडा नाका परिसरात मच्छीमारी व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसल्याची घटना समोर आली आहे. घराच्या खुल्या टेरेसवर ठेवण्यात आलेल्या तब्बल १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या मच्छीमारीच्या जाळ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इम्रान कमरुद्दीन मल्ला (रा. राजीवडा निवखोल, रत्नागिरी) यांच्या मालकीच्या मच्छीमारीच्या जाळ्या त्यांच्या सासरे मकबल मोहम्मद मोतीवाले यांच्या राजीवडा नाका येथील घराच्या खुल्या टेरेसवर सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते १५ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने या जाळ्या चोरीच्या उद्देशाने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख ३५ हजार रुपये किमतीची लाल रंगाची पर्सनल नायलॉन धाग्याची मच्छीमारीची जाळी तसेच ५० हजार रुपये किमतीची हिरव्या रंगाची नायलॉन धाग्याची दुसरी जाळी असा एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा माल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी फिर्यादी यांनी ३ ऑगस्ट २०२६ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चोरीमागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील उपलब्ध पुरावे, माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास करत असून, लवकरच या चोरीचा उलगडा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :
4637108
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *