दिल्ली: आईचं प्रेम हे प्रत्येक सजीवामध्ये सारखंच असतं, याची प्रचिती देणारा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील समुद्रात एका डॉल्फिन मादीने आपल्या अवघ्या दहा दिवसांच्या मृत पिल्लाचा मृतदेह पाठीवर घेऊन समुद्रात फिरत असल्याचं भावनिक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘फ्रॅगल’ नावाच्या या डॉल्फिनने दोन आठवड्यांपूर्वी एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र जन्मानंतर काही दिवसांतच त्या पिल्लाचा मृत्यू झाला. तरीही फ्रॅगलने आपल्या पिल्लाची साथ सोडली नाही. ती कधी पाठीवर, तर कधी पुढे ढकलत त्या पिल्लाचा मृतदेह घेऊन समुद्रात पोहताना दिसत आहे. अनेकदा ती आपल्या कळपासोबतही पिल्लाला सोबत ठेवताना आढळली.
ही घटना पश्चिम ऑस्ट्रेलियातील लेशेनॉल्ट एस्टुअरी परिसरातील असून, तेथील डॉल्फिनवर संशोधन करणाऱ्या पथकाने हा व्हिडीओ चित्रित केला आहे. संशोधकांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार, फ्रॅगल अनेक दिवसांपासून आपल्या मृत पिल्लाला सोबत घेऊन फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही तिने चार पिल्लं गमावली असल्याची माहिती समोर आली आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात जन्मलेल्या डॉल्फिनच्या पिल्लांचं जगणं तुलनेने कठीण असतं. जेव्हा या पिल्लाचं निरीक्षण करण्यात आलं, तेव्हा त्याचा श्वास अतिशय वेगाने सुरू असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे ते फार काळ जिवंत राहणार नाही, अशी शक्यता संशोधकांनी आधीच व्यक्त केली होती.
या घटनेतील आणखी एक भावनिक बाजू म्हणजे, पिल्लाच्या मृत्यूनंतर फ्रॅगल एकटी पडलेली दिसत नाही. इतर डॉल्फिन तिच्या भोवती फिरताना, तिच्यासोबत पोहताना आणि तिची साथ देताना या व्हिडिओमध्ये दिसतात. समुद्रातील या निःशब्द सहवासाने अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे.
लेशेनॉल्ट एस्टुअरी परिसरात डॉल्फिनची संख्या मर्यादित असून, दरवर्षी नवजात पिल्लं पाहायला मिळतातच असं नाही. त्यामुळे या पिल्लाचा मृत्यू संशोधकांसाठीही धक्कादायक ठरला आहे. तज्ज्ञांच्या मते, डॉल्फिन आपल्या पिल्लांशी अत्यंत घट्ट भावनिक नातं जोडतात. त्यामुळे पिल्लाचा मृत्यू झाल्यानंतर त्या अनेक तास, कधी कधी अनेक दिवसही त्याचा मृतदेह सोबत घेऊन फिरतात. हा व्हिडीओ त्या मातृत्वाची आणि निसर्गातील अतूट मायेची जिवंत साक्ष ठरत आहे.




