‘क्षणभर उशीर झाला असता तर…!’ चालत्या लोकलसमोर तरुणाची जीवघेणी कृती; मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे मृत्यूच्या दारातून बचाव

Gramin Varta
259 Views

नालासोपारा : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा रीलच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, बुधवारी नालासोपारा आणि वसई रोड स्थानकादरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. एका तरुणाने थेट चालत्या लोकलसमोर रुळांवर उभे राहत गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मोटरमनच्या विलक्षण प्रसंगावधानामुळे भीषण दुर्घटना टळली आणि एका तरुणाचा जीव वाचला.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून संबंधित तरुणाच्या बेजबाबदार कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण रुळांवर ठामपणे उभा राहून येणारी लोकल थांबवण्याचा प्रयत्न करत होता. मोटरमनने सतत हॉर्न वाजवत तसेच बाजूला होण्याचे संकेत देत इशारे दिले. लोकलमधील प्रवाशांनीही त्याला वारंवार रुळावरून बाजूला होण्याचे आवाहन केले. मात्र, तो कोणत्याही सूचनेकडे दुर्लक्ष करत जागेवरच उभा राहिला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मोटरमनने क्षणाचाही विलंब न करता तातडीने ‘इमर्जन्सी ब्रेक’ लावले. लोकल तरुणापासून अवघ्या काही अंतरावर येऊन थांबली आणि संभाव्य भीषण दुर्घटना टळली. त्यानंतरही तरुण रुळांवरून बाजूला होत नसल्याने एका धाडसी प्रवाशाने खाली उतरून त्याला बाजूला खेचत सुरक्षितस्थळी नेले. या प्रकारामुळे काही काळ लोकल वाहतूक विस्कळीत झाली आणि प्रवाशांचा खोळंबा झाला.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना आवाहन केले आहे की, रेल्वे रुळांवर अनधिकृतपणे उतरणे किंवा स्वतःचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालणारे कोणतेही कृत्य करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासापोटी किंवा क्षणिक थरारासाठी केलेली अशी कृत्ये स्वतःसह शेकडो प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Total Visitors :
4645777
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *