लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शकुंतलाबाई यांचं निधन, वयाच्या 92 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gramin Varta
5 Views

मुंबई: लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल यांचं निधन झालं आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

शकुंतला सपताल या अलीकडे नालासोपारा इथं आपला मुलगा प्रशांत यांच्या घरी वास्तव्यास होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रेनस्टोक झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. २ ऑगस्ट रोजी पहाटे २.४५ वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झालं. शकुंतला सपताल यांच्यावर मोजक्यात नातेवाईकांच्या उपस्थितीत ३ ऑगस्ट रोजी नालासोपारा इथं अंत्यस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात संजय , राजेश, प्रशांत ही मुलं, मुलगी नंदिनी आणि नातवंडं असा परिवार आहेत. त्यांचा विवाह इस्लामपूर येथील शिक्षित तरुण अजित सपताल यांच्या सोबत कॉ. अण्णा भाऊ साठे यांनीच करून दिला होता.



शकुंतलाबाई या त्यांच्या बालपणी कम्युनिस्ट पक्षाच्या “बाल संघात आणि सांस्कृतिक कला पथकात, जेष्ठ बहिण कॉ.शांताबाई, रोझा डांगे, कमल, सत्येंद्र मोरे, प्रभाकर मिरजकर, सुमन मोकाशी (संझगिरी)आदी. बाल कार्यकर्त्यांसह सांस्कृतिक कलापथकात सक्रिय होत्या. तसंच पक्षाच्या मुखपत्रांची विक्री करण्यात आपली आई कॉ.जयवंताबाई साठे यांच्या समवेत आघाडीवर आघाडीवर असायच्या. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे चिराग नगरात भुमिगत असताना त्यांना पोलिसी ससेमारा चुकवून कम्युनिस्ट पक्षाचे साहित्य,पत्रक त्या गुपचूप भेटून देत असत.

अण्णांच्या कादंबऱ्यांच्या पहिल्या वाचक

कॉ. अण्णा भाऊ साठेंच्या अनेक कथा, कादंबऱ्याच्या त्या प्रथम वाचक होत्या. अण्णा भाऊंचे अक्षर गिचमिड असल्याने त्यात त्या सुधारणा त्या करून द्यायच्या. त्यांना स्वतःलाही लिखाणाची आणि साहित्याची आवड असल्याने त्यांनी कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर कॉ. अण्णा भाऊंच्या विषयी अविस्मरणीय आठवणींचं लेखनही काही दिवाळी अंकात केलं होतं, त्यातील अण्णा भाऊ साठेंच्या गाजलेल्या ” फकिरा” कादंबरी लेखना संदर्भातील आठवण तर खूपच ह्रदयद्रावक शब्दात त्यांनी लिहिली होती .त्यांना अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याची आणि त्यांच्या राजकीय कार्याची चांगली जाण समज होती. कॉ.अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचे एक पुस्तकही शकुंतलाबाई आणि शांताबाई या मुलींना अर्पण केली आहे.

लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या सामाजिक, सांस्कृतिक व व्यक्तिगत कौटुंबिक जीवनाच्या अखेरच्या एकमेव साक्षीदार होत्या. शकुंतलाबाई सपताल यांना जनवादी लेखक संघ, प्रगतिशील लेखक संघ, लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ व डाव्या, पुरोगामी चळवळीतर्फे अभिवादन करण्यात आलं.

Total Visitors :
4630959
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *