गुहागरमध्ये संतापजनक प्रकार: विद्यार्थ्याला वर्गात अपमानित करून मारहाण, बालभारती पब्लिक स्कूलच्या वर्गशिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
329 Views

गुहागर :  तालुक्यातील अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूल (RGPPL कंपनी) या CBSE शाळेतील एका वर्गशिक्षिकेविरुद्ध विद्यार्थ्याला मानसिक त्रास देणे व मारहाण केल्याच्या आरोपावरून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वेलदूर-खोंडवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथील पालक निलेश विजय धामणकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, निलेश धामणकर यांचे दोन मुलगे प्रणेश व तनिष्क हे अंजनवेल येथील बालभारती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचा लहान मुलगा तनिष्क हा इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत आहे.

पालकांच्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, संबंधित वर्गशिक्षिकेचा विद्यार्थ्यांशी वागण्याचा स्वभाव रागीट व कठोर असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मागील शैक्षणिक वर्षात शाळेतील काही पालकांनी शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीबाबत तसेच संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित वर्गशिक्षिकेने त्याचा राग तनिष्कवर काढल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

तक्रारीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून तनिष्कला वर्गातील इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे ठेवत मागील बाजूस एका कोपऱ्यात बसवण्यात येत होते. तसेच, “यही तेरी जगह है” असे ओरडून सांगत त्याचा सर्व विद्यार्थ्यांसमोर अपमान केला जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय, “कोई इससे फ्रेंडशिप नहीं करेगा, कोई इसका फ्रेंड नहीं बनेगा” असे सांगून इतर विद्यार्थ्यांना तनिष्कपासून दूर राहण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी शाळा सुटल्यानंतर तनिष्क घरी आला असता तो मोठ्याने रडत होता. पालकांनी त्याची विचारपूस केली असता, “आज मॅडमनी माझ्या पाठीवर जोरजोरात चार-पाच बुक्क्या मारल्या,” असे त्याने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

लहान वयातील विद्यार्थ्याला अशा प्रकारे मारहाण झाल्याने तसेच वारंवार मानसिक त्रास दिल्याने तो मानसिक तणावाखाली गेला असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारानंतर पालक निलेश विजय धामणकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीच्या आधारे गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०/२०२६ अन्वये संबंधित वर्गशिक्षिकेविरुद्ध बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ७५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत असून, तपासादरम्यान संबंधित व्यक्तींचे जबाब, शाळेतील परिस्थिती व अन्य बाबींची चौकशी करण्यात येणार आहे.

Total Visitors :
4654190
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *