चिपळूणमध्ये पत्रकार भवन उभारण्यासाठी जर्नालिस्ट असोसिएशनचे नगराध्यक्षांना निवेदन

Gramin Varta
33 Views

पालिकेत पत्रकार कक्ष उभारण्याची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची घोषणा

चिपळूण : शहरातील पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन उभारण्याच्या दृष्टीने जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची नुकतीच भेट घेऊन निवेदन सादर केले. पत्रकार भवनासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून निधी उपलब्ध होणार असून, चिपळूण नगरपालिकेने त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूण ही शासनमान्य नोंदणीकृत संस्था असून, संस्थेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष सकपाळ यांच्याशी पत्रकार भवनासह शहरातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी नगराध्यक्षांनी पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. तसेच चिपळूण नगरपालिकेत तातडीने स्वतंत्र पत्रकार कक्ष सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली. या निर्णयाचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील साळवी, उपाध्यक्ष राजेंद्रकुमार शिंदे, सचिव दीपक शिंदे, सहसचिव योगेश बांडागळे, सदस्य मकरंद भागवत आणि ललेश कदम उपस्थित होते.

नगराध्यक्ष सकपाळ यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना शहराच्या आगामी विकासकामांची माहिती दिली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या निधीतून शहर विकासाचा ठोस आणि कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना, शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण यांसह विविध महत्त्वाच्या विकासकामांना चालना देण्यात येणार आहे. ही कामे वर्षभरात मार्गी लावण्याचे नियोजन असून, त्यानंतर चिपळूणची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असा विश्वास सकपाळ यांनी व्यक्त केला.

शहरातील विकासकामांसाठी नागरिक आणि जागामालकांचे नेहमीच सहकार्य मिळत आले आहे. कोणतेही काम दबावाने करण्याऐवजी नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी संवाद साधून पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी व एमपीएससी अभ्यासिका सुरू करण्याचा मानसही नगराध्यक्षांनी व्यक्त केला. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर वाहतुकीला अधिक शिस्त लागण्यास मदत होईल, असे मत त्यांनी मांडले.

Total Visitors :
4656588
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *