रत्नागिरी : येथील मिरकरवाडा बंदरात पारंपरिक आणि शाश्वत मच्छीमार नौकांसाठी मासोळी उतरवण्यासाठी स्वतंत्र जेटी उपलब्ध करून द्यावी आणि जिल्ह्याच्या समुद्रात सुरू असलेल्या अवैध मासेमारीवर प्रभावी नियंत्रण आणावे, या प्रमुख मागण्यांसाठी शाश्वत मच्छीमार हक्क संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दि. १५ ऑगस्टपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या मागणीसंदर्भात संघटनेने यापूर्वी अनेक वेळा मत्स्यव्यवसाय विभागाकडे अर्ज आणि निवेदने सादर केली होती. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी, मत्स्यव्यवसाय आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले आहे. संघटनेने स्वतंत्र जेटीच्या मागणीबरोबरच जिल्ह्याच्या समुद्रात सुरू असलेल्या अवैध मासेमारीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून विशेषतः एलईडी प्रकाशाचा वापर करून मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करताना केवळ संबंधित नौकेवरच नव्हे, तर अशा नौकांना सहकार्य करणाऱ्या मासेमारी नौकांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, मासेमारी परवाना देताना संबंधित नौकामलकांकडून अवैध मासेमारी करणार नाही, असे हमीपत्र घेण्यात यावे, जेणेकरून नियमांचे पालन अधिक प्रभावीपणे होईल, अशी सूचनाही शाश्वत मच्छीमार हक्क संघाने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्यदिनी आंदोलन छेडण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला असून, या भूमिमेमुळे मत्स्यव्यवसाय विभागाची भूमिका काय राहते, याकडे मच्छिमारांचे लक्ष लागले आहे.






