कोट्यवधींचा खर्च; कामे मात्र दर्जाहीन? मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या पुलांना तडे गेल्याने तीव्र संताप

Gramin Varta
73 Views

रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलांच्या कामांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नव्याने बांधलेल्या पुलांना तडे आणि भगदाडे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वडखळ येथे बाह्यवळण मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाचा स्लॅब कोसळल्याने भगदाड पडल्याची बाब समोर आली असून, त्यामुळे पुलाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. महामार्ग प्राधिकरणाने रातोरात हे भगदाड बुजवून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. नागोठणे येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेले असून, वाहतुकीसाठी तो खुला केल्यानंतर दोन महिन्यांत हा पूल वापरासाठी बंद करण्यात आला. पुलाची पाहणी करण्यासाठी दिल्लीवरून विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून, जोपर्यंत त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत पुलाची मार्गिका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोणेरे येथे बांधण्यात आलेल्या पुलाला निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भगदाड पडले असून, या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महामार्ग विभागाने या खड्ड्यांची दुरुस्ती सुरू केली असली तरी रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. नागोठणे, कोलाड आणि वडखळ येथील सेवा रस्त्यांची परिस्थिती खराब असून, या मार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. माणगाव आणि इंदापूरच्या बाह्य वळण रस्त्यांची कामे अजूनही दृष्टिक्षेपात नाहीत. गणेशोत्सवापूर्वी या बाह्यवळण रस्त्यांची किमान एक मार्गिका पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असले, तरी कामाची गती वाढवल्याशिवाय हे काम पूर्ण होणे कठीण आहे. २०११ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम तर २०१४ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले होते. पंधरा वर्षं होत आली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गाची दुरवस्था होते.

गणेशोत्सवात सुरक्षित प्रवासाची आश्वासने दिली जातात आणि काम पूर्ण करण्यासाठी नवनवीन मुदती जाहीर केल्या जातात, मात्र काम काही पूर्णत्वाकडे जात नाही. या रस्त्याला कोणी वाली नाही, सरकार मोठ्या कॉरिडोअर आणि शक्तीपीठ मार्गाच्या घोषणा करते, पण पंधरा वर्षांनंतरही मुंबई-गोवा महामार्ग काही पूर्ण होत नाही, वडखळ-अलिबाग सेवा रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे आणि यंत्रणांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी दिली आहे. दरम्यान, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी दोन दिवसांपूर्वी महामार्गाची पाहणी करून आढावा बैठक घेतली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथे महामार्गाच्या कामाची स्वतंत्र आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी महामार्गाची पाहणी केली. दरवर्षी गणेशोत्सव आला की मंत्र्यांचे आणि नेत्यांचे पाहणी दौरे सुरू होतात आणि आढावा बैठका घेतल्या जातात, पण काम पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय महामार्गावर पेव्हर ब्लॉक बसवणे अपेक्षित नाही, पण महामार्गावर वडखळ, नागोठणे, कोलाड परिसरात पेव्हर ब्लॉक बसवले जात आहेत, पेव्हर ब्लॉक ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे भरणे गरजेचे आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे.

माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची किमान एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, पण पाऊस जास्त असल्याने काम थंडावले होते, हा मार्ग कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणार आहे, त्यामुळे तुळई टाकण्यासाठी त्यांचे सहकार्य लागणार आहे आणि ते मिळाले तर काम वेळेत पूर्ण करता येईल, अशी माहिती रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.

- Advertisement -

Total Visitors :
4678916
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *