आरक्षणाच्या प्रतीक्षेने हिरावला संसाराचा आधार; ३० वर्षीय गणेशने जीव दिला, चिठ्ठीत सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आवाहन

Gramin Varta
143 Views

परभणी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याच्या नैराश्यातून जिंतूर तालुक्यातील ३० वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे मृत युवकाचे नाव असून, त्यांच्या खिशात ‘आरक्षण मिळत नसल्याने मी फाशी घेत आहे. सरकारने लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडवावा,’ असा मजकूर असलेली चिठ्ठी आढळून आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एका कुटुंबाचा आधार अचानक हरपल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गणेश ठोंबरे यांनी रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार नातेवाइकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गणेश यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच जिंतूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला. या प्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हवालदार ठाकूर करीत आहेत.

मृत गणेश ठोंबरे यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होते. गणेश यांचे चुलत भाऊ तथा पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी सांगितले की, मागील दोन-तीन दिवसांपासून गणेश हे ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा काहीच उपयोग होत नाही,’ असे म्हणत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.

गणेश ठोंबरे यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने ठोंबरे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी तसेच कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी भास्करराव ठोंबरे यांनी केली आहे.

सोमवारी (दि. १०) सकाळी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गणेश ठोंबरे यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या घटनेमुळे ठोंबरे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली असून, आरक्षणाच्या प्रश्नावरून एका तरुणाचा जीव गेल्याने सामाजिक आणि राजकीय पातळीवरही हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4678595
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *