सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला सैन्यदलातील जवानाने संपवले; पतीसह सासू सासरे अटकेत

Gramin Varta
5 Views

वाशिम : सात महिन्यांच्या गर्भात लेकरू वाढवत असलेल्या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कारंजा शहरातील शिवनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह त्याच्या आई-वडिलांना अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव दीपाली मदने असून, तिचा पती ज्ञानेश्वर मदने हा भारतीय सैन्याच्या ६व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. ज्ञानेश्वरने दीपाली घरातील काम करत असताना पडल्याचे सांगत तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना फोनवरून दिली. ही माहिती मिळताच दीपालीचा भाऊ आणि आई-वडील मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथून कारंजा येथे दाखल झाले. मात्र, तेथे दीपाली मृतावस्थेत आढळून आली.

दीपालीच्या गळ्यावर काही खुणा आढळल्याने तिच्या मृत्यूबाबत पोलिसांना संशय आला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. मृत महिलेचा भाऊ राहुल माने यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पती ज्ञानेश्वर मदने याच्यासह त्याच्या आई-वडिलांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ज्ञानेश्वरचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचा आरोप दीपालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. या कारणावरून दीपालीचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचेही तिच्या भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी याच वादातून दोन्ही कुटुंबांमध्ये बैठक होऊन समझोता करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.

मात्र, त्यानंतरही दीपालीचा छळ सुरूच राहिला आणि अखेर तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूने तिच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, दीपालीचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास अहवाल आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सत्य समोर येणार आहे.

Total Visitors :
4661801
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *