१३ ऑगस्ट नंतर राज्यभरात पावसाचा जोर वाढणार!

Gramin Varta
87 Views

मुंबई : राज्यात अनेक भागांत पावसाने सध्या दडी मारली असली पुढील काही दिवसांत पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः १३ ऑगस्टपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

येत्या चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून ऑगस्टच्या उत्तरार्धात काही भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने आठ ऑगस्टला जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ९ ते १२ ऑगस्टदरम्यानही कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग परिसरात पावसाच्या सरींची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही पावसाचा जोर वाढू शकतो. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

सरासरीच्या पुढे

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता असतानाही राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत ६३७ मिमी पाऊस पडला आहे, या काळात सरासरी ६२२.७ मिमी पाऊस पडतो, सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त पाऊस पडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत हिंगोलीत सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

Total Visitors :
4678588
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *