संसदेची नवी इमारत उभी राहते मग ग्रामीण भागात शाळा का नाहीत; स्वातंत्र्यदिनापासून कॉक्रोच जनता पार्टीचा नवा कार्यक्रम

Gramin Varta
5 Views

छत्रपती संभाजीनगर: गेल्या ऐंशी वर्षांत ग्रामीण भागातील सरकारी सरकारी शाळांकडे कमालीचे दुर्लक्ष करण्यात आले असून, देशात पंतप्रधानाचे नवे घर आणि संसदेची नवी इमारत उभी राहते, मात्र गावागावातील शाळांमध्ये साधी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिली जात नाही, असा संतप्त सवाल आंदोलक अभिजीत दिपके यांनी उपस्थित केला आहे. ऐंशीवा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आता गावागावात शाळांची स्थिती सुधारण्यासाठी पालकांनी शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण करावे आणि त्यांची छायाचित्रे क्रॉक्रोच जनता पार्टीकडे पाठवावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अभिजीत दिपके यांनी एका चलचित्रणाद्वारे प्रतिक्रिया नोंदवत ग्रामीण भागातील शाळांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न हाती घेतला आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करताना एका महत्त्वाच्या बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे, जर संसदेची नवी इमारत बांधता येते आणि पंतप्रधानाचे नवे घर उभे राहू शकते, तर मग ग्रामीण भागातील शाळा चांगल्या का उभ्या राहिल्या नाहीत, गावांमधील मुले आपल्या देशाचे भवितव्य नाहीत असे आपल्याला वाटते का, असे परखड प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. तसेच, शाळांच्या सुधारणेसाठी गावागावातील सरपंचांनी या गंभीर प्रश्नी तातडीने लक्ष घालावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

हा स्वातंत्र्यदिन साजरा करताना हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी जाऊन शाळांच्या पायाभूत सुविधांबाबत जागृती निर्माण करणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले आहे. गावागावातील शाळांमधील पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी पालकांनी आवर्जून शाळेत जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या मुलांना शाळेत पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहाची योग्य स्थिती उपलब्ध आहे किंवा नाही, याची माहिती गोळा करण्यासाठी एक विशेष फॉर्म विकसित केला जाणार असून त्यात पालकांनी माहिती भरून पाठवावी. तसेच, ज्या सरपंचांनी आपल्या गावातील शाळा उत्तम प्रकारे सुधारल्या आहेत, त्यांचे ‘सीजेपी’च्या वतीने विशेष कौतुक केले जाईल आणि त्यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून त्यांना त्याचे श्रेय दिले जाईल, असेही दिपके यांनी सांगितले आहे. नीट आंदोलनानंतर आता ग्रामीण भागातील शाळांवर आपले लक्ष केंद्रित करत दिपके यांनी शाळांचे सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे मोठे आवाहन पालकांना केले असून, स्वातंत्र्यदिनापासून ‘सीजेपी’तर्फे ग्रामीण भागातील शाळांच्या प्रश्नावर तीव्र लढा दिला जाईल, असा थेट संदेश त्यांनी दिला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4678597
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *