अनोळखी कॉल आणि फ्रॉडला बसणार मोठा ब्रेक; ‘१६००’ नंतर आता ‘१६०१’ सिरीज लागू करण्याचा ट्रायचा महत्त्वपूर्ण निर्णय

Gramin Varta
63 Views

दिल्ली: बँकिंग, वित्तीय सेवा आणि सरकारी कामांशी संबंधित महत्त्वाचे कॉल्स ओळखण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या १६०० सिरीजच्या धर्तीवर, आता इतर क्षेत्रांतील सेवा कॉल्ससाठी १६०१ ही नवीन नंबर सिरीज बंधनकारक करण्यात आली असून भारतीय टेलिकॉम नियामक प्राधिकरणाने सोमवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. पहिल्या टप्प्यात वीज, पाणी, गॅस यांसारख्या उपयुक्त सेवा, तसेच कुरियर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांना सर्व्हिस आणि ट्रान्सॅक्शनल कॉल्ससाठी या नवीन १६०१ सिरीजचा वापर करावा लागणार आहे.

ट्रायने स्पष्ट केले आहे की, सध्या बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्रातील कंपन्या आणि सरकारी कंपन्यांच्या सेवा आणि व्यवहारांच्या कॉलसाठी १६०० या क्रमांकापासून सुरू होणारी मालिका वापरली जात असून, याचप्रमाणे आता विविध सुविधा, कुरियर आणि मालवाहतूक कंपन्यांच्या सेवा आणि व्यवहारांच्या कॉलसाठी १६०१ ही स्वतंत्र क्रमांक मालिका असेल, मात्र या मालिकेतील क्रमांकाचा वापर व्यवसाय प्रोत्साहनासाठी करण्यात येऊ नये. बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्रातील कंपन्या आणि सरकारी कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या कॉलचे संवेदनशील स्वरूप पाहता इतर क्षेत्रातील कॉलसाठी स्वतंत्र १६०१ क्रमांक मालिका आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यातून महत्त्वाच्या आर्थिक कॉलसोबत इतर क्षेत्रातील सेवा आणि व्यवहारांच्या कॉलची सरमिसळ होणार नाही.

या नवीन मालिकेतील क्रमांक कंपन्यांना देण्याची प्रक्रिया दूरसंचार विभागाकडून टप्प्याटप्प्याने राबविण्यास सुरुवात झाली असून, सर्व भागधारकांशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्रायने नमूद केले आहे. या नवीन मालिकेतील क्रमांक पात्र कंपन्यांना थेटपणे वितरित केले जातील आणि कोणत्याही मध्यस्थ कंपन्यांना हे क्रमांक दिले जाणार नाहीत, ज्यामुळे ग्राहकांना आवश्यक असलेले सेवा आणि व्यवहारांचे कॉल सहजपणे ओळखता येणे शक्य होणार असून ग्राहकांचा या संपूर्ण यंत्रणेवरील विश्वास वाढण्यास मोठी मदत होईल, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4678591
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *