‘जय भोळे साई’ नौकेवर कारवाई; मासळीच्या लिलावातून ४.१० लाख शासन जमा

Gramin Varta
19 Views

रायगड : केंद्र शासनाने १ ऑगस्टपासून समुद्रातील मासेमारीवरील बंदी उठविली असली, तरी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत पावसाळी मासेमारी बंदी लागू आहे. या बंदी आदेशाला केराची टोपली दाखवत करंजा खाडीत मासेमारी करणाऱ्या ‘जय भोळे साई’ या नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली.

नौका ताब्यात घेतल्यानंतर त्यावरील मासळीचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून तब्बल ४ लाख १० हजार रुपये प्राप्त झाले असून, ही रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.

‘जय जीवदानी’ या गस्ती नौकेच्या सहाय्याने मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पावसाळ्यात मासे प्रजननाच्या काळात असल्याने मत्स्यसंपदेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू केली आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आहेत.

गस्तीवर असलेल्या पथकाला ‘जय भोळे साई’ नौका मासेमारी करताना आढळून आली. तपासणीदरम्यान बंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नौका ताब्यात घेण्यात आली. ही नौका ससून डॉक बंदरावर नोंदणीकृत असल्याची माहिती विभागाने दिली.

नौकेवरील मासळीचा लिलाव करण्यासाठी अलिबागचे परवाना अधिकारी महादेव नांदोस्कर, श्रीवर्धनचे अक्षय साळुंखे आणि उरणचे सुरेश बाउलगावे यांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास लिलाव सुरू झाला. त्यातून ४ लाख १० हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली.

दरम्यान, नौका ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीसाठी मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी प्रकरणाची माहिती सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रायगड-अलिबाग यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्या नौकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय विभागाने दिला आहे.

Total Visitors :
4685158
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *