१६ वर्षीय मुलीला इंस्टाग्रामवर जाळ्यात ओढलं; धमकावून ओलीस ठेवलं अन्  वारंवार लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाला अटक

Gramin Varta
286 Views

नागपूर : सोशल मीडियावर झालेली ओळख एका १६ वर्षीय मुलीसाठी भयावह ठरल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. इंस्टाग्रामवर बनावट नावाने मैत्री करून अल्पवयीन मुलीचे खासगी फोटो मिळवले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव आणल्याचा आरोप १९ वर्षीय तरुणावर आहे. त्यानंतर मुलीला नागपूरच्या दिघोरी परिसरातील भाड्याच्या खोलीत ओलीस ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी १९ वर्षीय निर्भय पखारे याला अटक केली आहे. आरोपीने ‘आकाश मेहरा’ या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून पीडित मुलीशी संपर्क साधला होता. दोघांमध्ये संवाद वाढल्यानंतर आरोपीने तिचे काही खासगी फोटो मिळवले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणल्याचे पोलिसांनी सांगितले.

धमक्यांमुळे घाबरलेली मुलगी आरोपीच्या संपर्कात राहिली. याचाच गैरफायदा घेत आरोपीने तिला दिघोरी परिसरातील एका भाड्याच्या खोलीत ओलीस ठेवल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. अत्याचाराला विरोध केल्यास मारहाण करण्यात येत असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला बेल्टने मारहाण केली. तसेच चाकूने तिच्या शरीरावर अनेक वार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपीने वापरलेले पट्टे आणि बेल्ट नागपूरमधील दोन पेट शॉपमधून खरेदी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी २ ऑगस्ट रोजी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे तिचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर ३ ऑगस्टच्या रात्री पोलिसांनी संबंधित खोलीचा दरवाजा तोडून अल्पवयीन मुलीची सुटका केली.

सुटकेनंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणात संबंधित घरमालकाचीही चौकशी करण्यात येत आहे. भाडेकरूची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

या घटनेमुळे अल्पवयीन मुलांशी सोशल मीडियावर होणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या संपर्काचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Total Visitors :
4697479
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *