चक्क गाढवाला रंगवले तिरंग्याच्या रंगाने; चिपळुणात संताप

Gramin Varta
498 Views

चिपळूण : शहरातील कावीळतळी परिसरात गाढवाच्या अंगावर भगवा, पांढरा आणि हिरवा रंग लावल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. गाढवाला तिरंग्याच्या रंगात रंगविल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

कावीळतळी परिसरात गाढवाच्या अंगावर तिरंग्याचे तीन रंग लावलेले आढळून आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कृत्यामागे परिसरातीलच एका १० वर्षीय मुलाचा सहभाग असल्याचे समोर आले.

पोलिसांनी संबंधित मुलासह त्याच्या वडिलांना चौकशीसाठी बोलावून या प्रकाराबाबत विचारणा केली. चौकशीदरम्यान मुलाने कोणताही राजकीय किंवा देशविरोधी हेतू नसताना हा प्रकार केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या पालकांना समज देत अशा प्रकारच्या कृत्यांचे गांभीर्य समजावून सांगितले.

दरम्यान, मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी गाढवाच्या अंगावर लावलेला रंग पाण्याने धुऊन काढला. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही, अशी हमीही पोलिसांना देण्यात आली.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे सुरुवातीला वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. मात्र पोलिसांच्या तपासातून सत्य समोर आल्याने या प्रकरणामागे कोणताही राजकीय अथवा देशद्रोही हेतू नसल्याचे स्पष्ट झाले. देशाची राष्ट्रीय प्रतीके आणि तिरंग्याचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, केवळ गंमत किंवा खोडसाळपणातूनही अशा प्रकारचे कृत्य करू नये, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.

Total Visitors :
4705713
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *