दापोली : श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., दापोली येथील सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीतील कथित गैरव्यवहार, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप आणि ठेवीदारांच्या रकमेचा अपहार केल्याच्या आरोपांप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे दापोलीतील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी श्रीमती श्रीया जीवन झगडे यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६२/२०२६ अन्वये १६ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटीया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळुराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट, भिकू रामचंद्र मोरे आणि हेमंत आत्माराम केळेकर यांचा समावेश आहे.
फिर्यादीच्या माहितीनुसार, मा. उपजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांच्या १४ ऑगस्ट २०२४ रोजीच्या आदेशान्वये पतसंस्थेचे संबंधित कालावधीतील लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणादरम्यान संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक आणि कर्ज अधिकाऱ्यांनी संगनमत करून कर्जासाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याची माहिती असतानाही त्याआधारे कर्ज मंजूर करून संस्थेच्या उपविधीतील नियमांचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, कर्जवाटपाच्या प्रक्रियेत कथित अनियमितता करून संस्थेच्या ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या ठेवींना गैरहानी पोहोचविण्याच्या उद्देशाने अपहार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४१७, ४१८, ४६५, ४६८, ४७१, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १४६ व १४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणातील आरोपांची सत्यता, कथित गैरव्यवहाराची व्याप्ती तसेच कर्जवाटप आणि कागदपत्रांमधील अनियमिततेबाबत पुढील पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे. या प्रकरणामुळे संबंधित पतसंस्थेतील ठेवीदार आणि सभासदांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
दापोली : गोपाळकृष्ण पतसंस्थेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी १३ जणांविरोधात फौजदारी गुन्हा
Leave a Comment





