पालशेत/ उदय दणदणे: गुहागर तालुक्यातील पालशेत बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी व चिखल साचत असल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पालशेत बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात दिपक शिरगांवकर यांच्या किराणा दुकानाजवळ तसेच बाजारपेठेच्या सुरुवातीला देसाई किराणा दुकानाजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांसह अन्य वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून एसटी बस, रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच मोठ्या प्रमाणात खासगी वाहने ये-जा करीत असल्याने रस्त्याची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
पालशेत बाजारपेठ ही पंचक्रोशीतील नागरिकांसाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून पालशेत-अंधेरी-वाकणमार्गे अडूर, बोऱ्या, बुधल आदी परिसरातील नागरिकही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था केवळ पालशेतपुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकारी तसेच राजकीय प्रतिनिधींचीही या मार्गावरून नियमित ये-जा असतानाही रस्त्याच्या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक दक्ष नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून या काळात पालशेत परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, भाविक, व्यापारी आणि पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच रस्त्याची डागडुजी न झाल्यास वाहतूक कोंडी तसेच अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
पालशेत ग्रामपंचायत आणि संबंधित बांधकाम विभागाने या समस्येची तातडीने दखल घेऊन बाजारपेठेतील खड्डेमय रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याची दुरुस्ती केवळ वाहतुकीच्या सोयीसाठी नव्हे, तर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खड्ड्यांनी व्यापला पालशेत बाजारपेठेचा मुख्य रस्ता; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
Leave a Comment




