चिपळूण : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर मांसाहाराची मागणी काही प्रमाणात घटल्याने चिपळूणच्या बाजारपेठेत अंडी, चिकन आणि मासळीच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. दुसरीकडे भाज्यांचे दरही नियंत्रणात असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. मांसाहारी पदार्थांच्या दरात घट झाली असली तरी मटणाचे दर मात्र अद्याप ९६० रुपये किलोवर कायम आहेत.
काही महिन्यांपूर्वी अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. वाढती मागणी आणि कमी झालेला पुरवठा यामुळे अंड्यांचा शेकडा दर तब्बल ७६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता मात्र मागणी कमी झाल्याने आणि बाजारात उपलब्धता वाढल्याने हाच दर ५५० रुपये शेकड्यावर आला आहे.
चिकनच्या दरातही मोठी घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी २६० ते २८० रुपये किलोपर्यंत पोहोचलेले चिकन सध्या १६०, १८० आणि २०० रुपये किलो दराने विकले जात आहे. त्यामुळे चिकन खाणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. श्रावण महिन्यात अनेकजण मांसाहार टाळत असले तरी या परंपरेशी संबंधित नसलेल्या ग्राहकांकडून चिकनला चांगली मागणी असल्याचे बाजारातील चित्र आहे.
पावसाळ्यात मासेमारीवर असलेली बंदी उठल्यानंतर मासळीची आवक हळूहळू वाढू लागली आहे. त्यातच श्रावण महिन्यामुळे मासळीच्या मागणीत काही प्रमाणात घट झाल्याने दरही खाली आले आहेत. सध्या चिपळूणच्या मासळी बाजारात बांगडा १८० रुपये किलो, सुरमई ४०० रुपये, पापलेट १ हजार रुपये, कोळंबी २५० ते ३०० रुपये, बेडा व बोंबील १६० रुपये, मांदेली १०० रुपये, मुशी व राजाराणी २०० रुपये, तर खेकडे १०० ते ४०० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
मासळीचे दर कमी झाल्याने आणि गेल्या काही महिन्यांपासून मासळीपासून दूर राहिलेल्या ग्राहकांची मागणी वाढल्याने बाजारात माशांच्या खरेदीला पुन्हा चालना मिळाली आहे. मात्र मटणाच्या दरात कोणतीही घट झालेली नाही. मटणाचा दर सध्या ९६० रुपये किलो इतकाच आहे. श्रावणामुळे मटणाच्या मागणीवरही परिणाम झाला असला तरी नियमित मांसाहार करणाऱ्या ग्राहकांकडून खरेदी सुरू आहे.
दरम्यान, श्रावण महिन्यात मांसाहाराची मागणी कमी झाल्यानंतर भाज्यांचे दर वाढण्याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आला आहे. यंदा मात्र त्याउलट परिस्थिती असून बाजारात भाज्यांचे दर स्थिर आहेत. चिपळूणच्या बाजारपेठेत टोमॅटो २५ रुपये किलो, मिरची, गवार आणि फरसबी ८० रुपये, कोबी ४० रुपये, कारले व फ्लॉवर ६० रुपये, तर काकडी आणि गाजर ५० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
मांसाहारी पदार्थांचे दर कमी झाल्याने खवय्यांना दिलासा मिळाला असून, भाज्यांचे दरही नियंत्रणात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना यंदाच्या श्रावणात बाजारभावाच्या दृष्टीने काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र चिपळूण बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
चिपळूण बाजारात अंडी, चिकन आणि मासळी स्वस्त, भाज्यांचे दरही स्थिर
Leave a Comment





