माजी सभापती-जिल्हा परिषद सदस्या पूजाताई निकम यांच्या उपस्थितीत ढोक्रवली येथे नैसर्गिक शेतीशाळा संपन्न

Gramin Varta
8 Views

चिपळूण : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत ‘आत्मा’ (ATMA) अंतर्गत मौजे ढोक्रवली येथे नैसर्गिक शेतीशाळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या तथा माजी सभापती  सौ. पूजाताई शेखर निकम आणि पंचायत समिती सदस्य  शरद शिगवण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मार्गदर्शन करताना पूजाताई निकम म्हणाल्या, “तरुण पिढीने आधुनिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांना कमी वापर करून शेणखतापासून बनवलेले जीवामृत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर वाढवला पाहिजे. विषमुक्त अन्न पिकवून स्वतःचे आरोग्य सुधारावे आणि आर्थिक उत्पादनही वाढवावे.”

‘लाखी बाग’ मॉडेल तयार करण्याच्या सूचना

या भागात शेतीचा दर्जा आणि उत्पादन वाढवण्यासाठी ‘लाखी बाग’ नावाचे एक आदर्श मॉडेल उभे राहिले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे मॉडेल परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, या दृष्टीने तातडीने काम करावे अशा सूचना त्यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना दिल्या.

रानभाज्यांचे प्रदर्शन ठरले आकर्षण

या शेतीशाळेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘रानभाजी महोत्सव’ हा होता. आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेल्या विविध रानभाज्यांची माहिती व्हावी यासाठी प्रत्यक्ष रानभाज्या आणून त्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. तसेच जीवामृत आणि सेंद्रिय खते कशी तयार करावीत याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमादरम्यान तालुका कृषी अधिकारी  शत्रुघ्न म्हेत्रे यांनी शासनाच्या विविध अनुदान योजनांची माहिती दिली.

याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी  मनोज गांधी, उपकृषी अधिकारी  विकास पिसाळ, कृषी सहाय्यक श्रीमती निंबाळकर, सरपंच लक्ष्मण मांडवकर, प्रगतशील शेतकरी मानसिंग महाडिक, धाकटू गावकर, मनोहर महाडिक, पोलीस पाटील सुरेश राठोड, सीआरपी समिता शिगवण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Total Visitors :
4756348
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *