राज्यस्तरीय युवती प्रेरणा पुरस्काराने डॉ. महेक मुस्कान मुराद अडरेकर यांचा गौरव

Gramin Varta
60 Views

चिपळूण : सह्याद्री वृत्तवाहिनीच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “युवती प्रेरणा पुरस्कार” यंदा चिपळूण येथील कन्या डॉ. महेक मुस्कान मुराद अडरेकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे अडरेकर कुटुंबासह संपूर्ण गाव व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सह्याद्री समाचारचे ज्येष्ठ पत्रकार, उत्कृष्ट निवेदक, शाहीर, लेखक आणि संविधान चळवळीतील नेतृत्व म्हणून परिचित असलेले शाहिद खेरटकर यांचे अडरेकर कुटुंबीयांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

अडरेकर कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंब असून, महेक यांच्या आजोबा अहमद अडरेकर आणि आजी आमीना अडरेकर यांनी अत्यंत कष्ट, शिस्त आणि संस्कारांच्या बळावर आपल्या कुटुंबाला घडवले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी आपल्या सहाही मुलांना सक्षम बनविले. आज या कुटुंबातील अनेक सदस्य विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. कोणी बँकिंग क्षेत्रात, कोणी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात, तर पुढील पिढीतील मुली आर्किटेक्चर, फार्मसी, मायक्रोबायोलॉजी, मानसशास्त्र, बीसीए तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेत आहेत.

कुटुंबातील कोणी तरी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठे यश मिळवावे, अशी इच्छा असली तरी ती पूर्ण होऊ शकली नव्हती. त्यामुळे मुलगी डॉक्टर व्हावी, ही मुराद अडरेकर यांची प्रामाणिक इच्छा होती. सुरुवातीला महेक यांची फॉरेन्सिक क्षेत्रात जाण्याची इच्छा होती; मात्र परिस्थितीमुळे त्यांनी फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची निवड केली आणि कठोर परिश्रम, जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्या कुटुंबातील तसेच गावातील पहिल्या डॉक्टर होण्याचा मान प्राप्त केला.

डॉ. महेक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट, चिपळूण येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या गद्रे महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यांनी सर्व शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत पूर्ण केले.

सन २०२१-२२ मध्ये त्यांनी बेंगळुरू येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस संलग्न हर्षा मेडिकल कॉलेज येथे फिजिओथेरपी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी प्रथम श्रेणीत पदवी संपादन केली. यानंतर जागतिक दर्जाचे प्रसिद्ध फोर्टिस रुग्णालय, बेंगळुरू येथे आठ महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केली. सध्या त्या चिपळूण येथील प्रसिद्ध लाईफ केअर रुग्णालयात गेल्या पाच महिन्यांपासून फिजिओथेरपिस्ट म्हणून सेवा देत आहेत.

राज्यस्तरीय “युवती प्रेरणा पुरस्कार” प्राप्त करून डॉ. महेक मुस्कान मुराद अडरेकर यांनी केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण गाव, समाज आणि चिपळूण तालुक्याचा गौरव वाढविला आहे. त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Total Visitors :
4755933
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *