ग्रामीण वार्ताच्या बातमीचा इम्पॅक्ट; पालशेत बाजारपेठेतील जीवघेणे खड्डे अखेर बुजवले

Gramin Varta
40 Views

पालशेत/ उदय दणदणे: पालशेत बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना होत असलेल्या त्रासाबाबत ग्रामीण वार्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची प्रशासनाने तात्काळ दखल घेत अखेर रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवण्याची कार्यवाही केली आहे.

“खड्ड्यांनी व्यापला पालशेत बाजारपेठेचा मुख्य रस्ता; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर परिसरातील नागरिकांच्या समस्येला वाचा फुटली होती. या वृत्ताचा परिणाम म्हणून पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी स्वतः पालशेत बाजारपेठेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

ग्रामस्थांच्या उपस्थितीत शनिवार, २२ ऑगस्ट रोजी रात्री युद्धपातळीवर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. बाजारपेठेतील मुख्य मार्गावरील सर्व धोकादायक खड्डे बुजवण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः दीपक शिरगांवकर यांच्या दुकानासमोरील मोठा आणि अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता असलेला खड्डा पूर्णपणे बुजवण्यात आला.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची दुरुस्ती झाल्याने व्यापारी, वाहनधारक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून सभापती प्रणव पोळेकर तसेच संबंधित प्रशासनाचे आभार मानले आहेत. स्थानिक समस्यांवर प्रकाश टाकणाऱ्या पत्रकारितेमुळे प्रशासनाला तत्काळ कार्यवाही करावी लागल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले असून, लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यास न्याय मिळतो, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Total Visitors :
4755942
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *