जाकादेवी/संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड-भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात पारंपरिक श्रावणी एक्का उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विविध भजन मंडळांच्या सुमधुर भजनांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
मालगुंड भंडारवाडा येथील श्री गोपाळ कृष्ण मंदिरात १९६६ सालापासून श्रावणी एक्का उत्सवाची अखंड परंपरा सुरू आहे. दरवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने परिसरातील लहान-थोर भाविक एकत्र येत हरिनामाचा गजर करतात. त्यामुळे धार्मिक वातावरणाबरोबरच सामाजिक एकोपा आणि बांधिलकी जोपासण्यासही मोठी मदत होत असल्याचे यावेळी दिसून आले.
उत्सवात लहान बालकांपासून महिला व पुरुषांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पंचक्रोशीतील विविध भजन मंडळांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी आणि अभंगांनी उत्सवाची रंगत वाढवली. टाळ-मृदंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या गजरात भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते.
या उत्सवात गोपाळ कृष्ण भजन मंडळ केदारवाडी, गणपतीपुळे गोपाळकृष्ण महिला मंडळ, भंडारपुळे भजन मंडळ, मोरया चौक गणपतीपुळे, भुतेवाडी भजन मंडळ, उत्कर्ष महिला मंडळ, रत्नागिरी वीरवाडी महिला मंडळ, भंडारपुळे-जांभूळवाडी भजन मंडळ यांसह पंचक्रोशीतील अनेक भजन मंडळांनी सहभाग घेतला.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाळकृष्ण मंदिर मंडळाचे अध्यक्ष भूषण मयेकर, उपाध्यक्ष किशोर पाटील, खजिनदार शेखर खेऊर, सचिव अजित पाटील यांच्यासह ट्रस्टी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य, महिला आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने भाविकांच्या उपस्थितीत उत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
मालगुंड भंडारवाड्यात श्रावणी एक्का उत्सव भक्तिभावात; भजन मंडळांच्या सहभागाने रंगली भक्तिरसाची मैफल
Leave a Comment





