वेलची महागली ! चक्क 4000 रुपये किलो

Gramin Varta
38 Views

रत्नागिरी : स्वयंपाकघरातील महत्त्वाचा मसाला असलेल्या वेलचीच्या दरात गेल्या महिनाभरात तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत चांगल्या दर्जाची वेलची आता तब्बल चार हजार रुपये किलो दराने विकली जात आहे. वेलचीच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम मिठाई विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या उत्पादन खर्चावर होत असून, त्याचा भार ग्राहकांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे.

चहा, कॉफी, खीर, बासुंदी यांसह विविध गोड पदार्थांमध्ये वेलचीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हॉटेल तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडूनही वेलचीची खरेदी केली जाते. त्यामुळे दरवाढीचा परिणाम व्यावसायिकांच्या खर्चावर झाला आहे. सणासुदीचे दिवस सुरू असल्याने गोड पदार्थांची मागणी वाढत असून, आगामी काळात वेलचीच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत महिनाभरापूर्वी सुमारे ३,५०० रुपये किलो दराने वेलचीची विक्री होत होती. आता हा दर चार हजार रुपये किलोवर पोहोचला आहे. म्हणजेच किलोमागे सुमारे ५०० रुपयांची वाढ झाली आहे. वेलचीच्या दरातील या वाढीमुळे ग्राहकांनाही किरकोळ खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. साधारण एका तोळ्यासाठी सध्या ४० ते ४५ रुपये खर्च येत आहे.

वेलचीचे उत्पादन दक्षिण भारतातील काही भागांत होते. उत्पादन, बाजारातील आवक, मागणी आणि दर्जा यानुसार वेलचीच्या दरात चढ-उतार होत असतात. सध्या उपलब्धतेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने दर वाढल्याचे सांगितले जात आहे.

वेलचीचा वापर केवळ स्वयंपाक आणि मिठाईपुरता मर्यादित राहिलेला नाही. जेवणानंतर मुखशुद्धीसाठीही वेलचीचा वापर केला जातो. हॉटेल, खानावळ तसेच विविध खाद्यपदार्थांच्या ठिकाणी वेलचीचा वापर होत असल्याने दरवाढीचा परिणाम व्यावसायिकांच्या खर्चावरही जाणवत आहे.

गणेशोत्सवापासून सणासुदीच्या काळात विविध मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी वाढते. श्रीखंड, बासुंदी, पेढे, खीर, लाडू यांसारख्या पदार्थांमध्ये स्वाद आणि सुगंधासाठी वेलचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात वेलचीचे दर आणखी वाढणार की स्थिर राहणार, याकडे ग्राहक आणि व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4755935
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *