कोकण-कोल्हापूर जवळ येणार; घोटगे-सोनवडे घाटाला केंद्राची अंतिम मंजुरी

Gramin Varta
111 Views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित घोटगे-सोनवडे घाटमार्गाच्या उभारणीतील महत्त्वाचा अडसर अखेर दूर झाला आहे. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण समितीकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार नीलेश राणे यांनी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या घाटमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घोटगे-सोनवडे घाटमार्गाची मागणी १९८५ पासून स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. या मागणीसाठी अनेकदा आंदोलने तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. वनविभागाची परवानगी आणि केंद्र शासनाच्या विविध स्तरांवरील मंजुरी ही या प्रकल्पासमोरील प्रमुख आव्हाने होती. अखेर या सर्व प्रक्रियेतून मार्ग काढत प्रकल्पाला अंतिम हिरवा कंदील मिळाला आहे.

कुडाळ तालुक्यातील सोनवडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिवडाव या भागांना जोडणारा सुमारे १३ किलोमीटरचा घाटमार्ग आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात येणार आहे. या मार्गामुळे सिंधुदुर्गातील कुडाळ आणि मालवण तालुक्यांसह वेंगुर्ले व कणकवली तालुक्यांतील काही भागांचा कोल्हापूरशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागातील अनेक गावांना या नव्या मार्गामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पासाठी यापूर्वीही विविध पातळ्यांवर प्रयत्न झाले आहेत. २००९ मध्ये नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या घाटमार्गातील सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे काम झाले होते. मात्र पुढील टप्प्यात वनविभागाच्या परवानग्यांसह अन्य प्रशासकीय मंजुरीअभावी प्रकल्प रखडला होता. गेल्या काही वर्षांत आमदार नीलेश राणे यांनीही या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला आता यश आले आहे.

याबाबत बोलताना आमदार नीलेश राणे यांनी सांगितले की, प्रकल्पाला यापूर्वी पर्यावरणीय मंजुरी मिळाली होती. आता केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नीतेश राणे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. हा ऐतिहासिक प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्ण झाल्यानंतर कुडाळ ते घोटगे-सोनवडे हे अंतर सुमारे ४० किलोमीटरने कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कुडाळहून कोल्हापूरला जाण्यासाठी सध्या लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार असून, सुमारे दीड तासात कोल्हापूर गाठणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वर्षभर वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारा हा मार्ग पूर्ण झाल्यास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमधील दळणवळणासह व्यापार, पर्यटन आणि स्थानिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

Total Visitors :
4767260
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *