रत्नागिरीच्या उद्योगांना मोठी उभारी! एमआयडीसीला ‘ड प्लस’ दर्जा; गुंतवणुकीसह रोजगाराला मिळणार वेग

Gramin Varta
79 Views

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, रत्नागिरी एमआयडीसीचा ‘क’ वर्गातून थेट ‘ड प्लस’ वर्गात समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील विद्यमान उद्योजकांसह नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे.

‘ड प्लस’ दर्जामुळे रत्नागिरीतील उद्योगांना विशेष औद्योगिक क्षेत्रांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सवलती व सुविधांचा लाभ घेता येणार आहे. विशेषतः गडचिरोलीसारख्या भागांना मिळणाऱ्या औद्योगिक प्रोत्साहनाच्या धर्तीवर रत्नागिरीतील उद्योजकांसाठीही शासनाच्या विविध योजनांचे दरवाजे खुले होणार आहेत. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या योजनांचा लाभ तसेच बँक कर्ज मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास या निर्णयाची मदत होणार आहे.

मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराला वेग आला असून, लोटे परशुरामसह जिल्ह्यातील विविध एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग आणि प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. परिणामी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याबरोबरच जिल्ह्याच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. सुमारे १५० कोटी रुपयांचा ऑइल प्रोजेक्ट कार्यान्वित झाला असून, ‘कोकाकोला’ प्रकल्पातून दररोज सुमारे ४० टन मालाची वाहतूक करणारे ३० ट्रक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. लोटे एमआयडीसीमध्ये फिशिंग कंपन्यांसह पाच नव्या कंपन्यांची भर पडली असून ‘किल्ली’ वॉटर प्रॉडक्शनलाही चालना मिळत आहे.

याशिवाय अडाळी येथे तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या महाकाय सोलर प्रकल्पाची उभारणी प्रस्तावित आहे. भारती शिपयार्डचे पहिले स्वदेशी जहाजही यशस्वीपणे रवाना झाले आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीला मिळालेला ‘ड प्लस’ दर्जा जिल्ह्यातील औद्योगिक विस्तारासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर नवीन उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

Total Visitors :
4767643
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *