रत्नागिरीतील प्रसिद्ध ब्रिजपटू अभय लेले यांचे निधन; सामाजिक, खाद्यसेवा आणि ब्रिज क्षेत्रात हळहळ

Gramin Varta
91 Views

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध ब्रिजपटू तसेच वसंत फूड्सचे संचालक अभय लेले (वय ५९) यांचे शुक्रवारी दुपारी झाडगाव-शेरे नाका येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहरातील सामाजिक, खाद्यसेवा तसेच ब्रिज क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

अभय लेले हे रत्नागिरीतील नामांकित ब्रिज खेळाडू म्हणून परिचित होते. रत्नागिरी ब्रिज असोसिएशनमध्ये ते सक्रिय होते. ब्रिजच्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनेक बक्षिसे मिळवली होती. त्यांच्या निधनाने ब्रिज क्षेत्रातील एका सक्रिय खेळाडूला गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

ब्रिज क्षेत्रासोबतच अभय लेले यांनी खाद्यसेवेच्या माध्यमातूनही आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी वसंत फूड्सची सुरुवात करून रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी नाममात्र दरात घरपोच पोळी-भाजी सेवा सुरू केली. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

विशेषतः कोरोनाच्या महामारीच्या काळात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. प्रतिकूल परिस्थितीतही सेवाभावी वृत्तीने केलेल्या या कार्याचे त्यावेळी अनेकांनी कौतुक केले होते.

गेल्या काही महिन्यांपासून अभय लेले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते झाडगाव-शेरे नाका येथील आपल्या निवासस्थानी होते. मात्र, शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यावर मुरुगवाडा येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभय लेले यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगी, जावई आणि मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच रत्नागिरीतील सामाजिक, खाद्यसेवा आणि ब्रिज क्षेत्रातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Total Visitors :
4776688
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *