रत्नागिरीत ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

Gramin Varta
88 Views

रत्नागिरी : गोकुळ अष्टमीच्या उत्साहात रत्नागिरीत शरीरसौष्ठवाचा जल्लोष पाहायला मिळाला. राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था आणि वैश्य युवा संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सायंकाळी राधाकृष्ण मंदिर, बाजारपेठ येथे उत्साहात झाला. राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण रविंद्र सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था रत्नागिरीच्या वतीने गेल्या शंभर वर्षांपासून गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांची परंपरा जपली जात आहे. याच परंपरेतील जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने आयोजन केले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून वैश्य युवा संस्थेच्या पुढाकारामुळे या स्पर्धेला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.

दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून स्पर्धेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. यावेळी राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष राजन शेठ मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र शेठ वणजू, सेक्रेटरी बाबू शेठ खातू, रत्नागिरी नगरपरिषदेचे नगरसेवक केतन शेट्ये व सौरभ मलुष्टे, ज्येष्ठ नाट्यकर्मी सतीश दळी, रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य दादा शेठ दळी, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी, नरेंद्र शेठ वणजू यांच्यासह वैश्य युवा संस्थेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा वैश्य युवा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना युवकांनी क्रीडा क्षेत्रात सातत्याने पुढे यावे, असे आवाहन केले. शरीरसौष्ठवासाठी लागणारी मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचेही त्यांनी कौतुक केले.

यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथमच ‘मेन्स फिजिक्स’ या प्रकाराचा करण्यात आलेला समावेश. आतापर्यंत प्रामुख्याने बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले जात होते. शरीरसौष्ठव क्षेत्रातील बदलते स्वरूप लक्षात घेऊन विविध क्रीडा प्रकारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मेन्स फिजिक्सचा समावेश करण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी रत्नागिरी शहरातील क्रीडाप्रेमी, शरीरसौष्ठवपटू, युवक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धकांनी सादर केलेल्या दमदार शरीरयष्टी, आत्मविश्वासपूर्ण पोझिंग आणि उत्कृष्ट कामगिरीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

गोकुळ अष्टमीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला क्रीडा क्षेत्राची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे रत्नागिरीतील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शरीरसौष्ठवपटूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी ‘राधाकृष्ण श्री-२०२६’ हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.

Total Visitors :
4783931
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *