दापोली : बांबू लागवडीतून देवघरे कुटुंबाने साधला शेतीचा नवा प्रयोग

Gramin Varta
44 Views

दापोली : पारंपरिक शेतीसमोरील वाढते खर्च, मजुरांची टंचाई आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी दापोली तालुक्यातील महाळुंगे येथील मारुती विठोबा देवघरे यांनी बांबू लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रयत्नातून त्यांनी आपल्या शेत परिसरात सुमारे ६ हजार बांबूंची लागवड केली असून विविध प्रकारच्या वृक्षांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे.

कोकणातील आंबा, काजू आणि भातशेतीला विविध नैसर्गिक तसेच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे फळपिकांचे नुकसान होते, तर भातशेतीसाठी आवश्यक मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत. उत्पादन खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या पार्श्वभूमीवर देवघरे यांनी पर्यायी शेतीचा मार्ग स्वीकारला.

बांबूची लागवड केल्यानंतर त्याची वाढ आणि देखभाल तुलनेने सोपी असल्याने या पिकातून भविष्यात चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. देवघरे यांनी बांबूसोबत काजू, खैर, जांभूळ, शिसम, चिंच, पिंपळ, आवळा यांसारख्या विविध वृक्षांचीही लागवड केली आहे. त्यांच्या शेत परिसरात सुमारे ७०० विविध वृक्ष आणि ३०० सागाची झाडे वाढत आहेत.

या संपूर्ण उपक्रमासाठी देवघरे कुटुंबीयांसह प्रतीक देवघरे, शर्मिला शांताराम देवघरे, सुमित शांताराम देवघरे, क्षमा सुमित देवघरे, बालकृष्ण विठोबा देवघरे, शर्मिला बालकृष्ण देवघरे, मनीषा अनंता मुके, प्रगती शेखर परब, मानव गोविंद मुके आणि अभिमन्यू अर्जुन पवार यांचे सहकार्य मिळाले आहे.

बांबू लागवडीमुळे शेतीतून पर्यायी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे. वाढत्या मागणीचा विचार करून बांबू लागवडीकडे शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून पाहावे, असा संदेश देवघरे यांच्या प्रयोगातून मिळत आहे.

वृक्षलागवडीतून मिळणारे आर्थिक उत्पन्न पुन्हा पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी वापरण्याचा त्यांचा प्रयत्न असून, कोकणातील शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग अनुकरणीय ठरत आहे.

Total Visitors :
4789999
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *