संगमेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघाची सहविचार सभा उत्साहात

Gramin Varta
97 Views

शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा; संघटनात्मक एकजुटीचा निर्धार

संगमेश्वर/धनाजी भांगे: अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा संगमेश्वर यांच्या वतीने तालुका कार्यकारिणीची सहविचार सभा दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा आरवली नंबर 1 येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेला तालुक्यातील सुमारे 75 ते 80 शिक्षक बंधू-भगिनींची उपस्थिती लाभली.

सभेत शिक्षकांच्या विविध सेवाविषयक व प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेची भूमिका, कार्यपद्धती आणि आगामी काळातील संघटनात्मक कार्य याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

या सभेला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप देवळेकर, जिल्हा सचिव श्री. भालचंद्र घुले, चिपळूण तालुकाध्यक्ष तथा तज्ञ संचालक शिक्षक पतपेढी, दापोली तालुकाध्यक्ष श्री. विजय फंड तसेच श्री. संजय घाग यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. विजय फंड यांनी संघटनेची भूमिका, कार्यपद्धती आणि संघटनात्मक एकजुटीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष श्री. दिलीप देवळेकर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करताना शिक्षकांच्या न्याय्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहील, असे सांगितले.

सभेत उपस्थित शिक्षकांनी आपल्या विविध अडचणी, सूचना व अपेक्षा मांडल्या. तालुक्यातील कोणत्याही शिक्षकाला सेवाविषयक, प्रशासकीय अथवा अन्य अडचण निर्माण झाल्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सभेचे नियोजन व आयोजन तालुकाध्यक्ष श्री. प्रवीण प्रकाश सावंत, सरचिटणीस श्री. आनंद देशपांडे, कार्याध्यक्ष श्री. संतोष जाधव, श्री. आदम सय्यद, उपाध्यक्ष श्री. आबा सरगर, श्री. अरविंद पवार, श्री.अशोक जायभाये तसेच तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले.

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी संघटितपणे व सकारात्मक भूमिकेतून कार्य करावे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुका शाखांनी परस्पर सहकार्याने शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

“आपली समस्या ही संघटनेची जबाबदारी असून, शिक्षकांची एकजूट हीच संघटनेची खरी ताकद आहे,” या भावनेतून आगामी काळात संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प सभेत करण्यात आला.

Total Visitors :
4797587
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *