खेड : तालुक्यातील फुरुस-आमशेत येथे घराच्या छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत तब्बल ४१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. ही चोरी २ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजल्यापासून ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली.
याप्रकरणी फैज परकार (वय ६३, रा. फुरुस-आमशेत, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे घरात नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या छतावरील कौले काढली आणि घरात अनधिकृत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केल्यानंतर चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील ३७ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच हॉलमध्ये ठेवलेल्या दोन दानपेट्या फोडून त्यातील अंदाजे ४ हजार रुपयांची रोकडही लंपास केली. अशा प्रकारे एकूण ४१ हजार रुपयांची रोकड चोरीस गेली आहे.
या प्रकरणी ३ सप्टेंबर रोजी रात्री ७.४२ वाजता खेड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०४(२), ३(५) तसेच संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणारा अज्ञात असून त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
खेड: फुरुसमध्ये घराच्या कौले काढून चोरी; ४१ हजारांची रोकड लंपास
Leave a Comment






