रत्नागिरी: कापडगाव येथे लोखंडी प्लेट वाहतूक करणारा ट्रक पलटी; चालक केबिनमध्ये अडकला

Gramin Varta
290 Views

अग्निशमन पथकाच्या प्रयत्नांना यश

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथून पालीच्या दिशेने लोखंडी प्लेट घेऊन जाणाऱ्या ट्रकला कपडगाव येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या दुभाजकाला धडकून पलटी झाला. या दुर्घटनेत चालक ट्रकच्या केबिनमध्ये अडकून पडल्याने काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एएसआय कमलाकर तळेकर, कॉन्स्टेबल नागेश खामकर आणि होमगार्ड सूरज सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेत मदतकार्य सुरू केले. चालक केबिनमध्ये अडकल्याचे लक्षात येताच तातडीने एमआयडीसी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

एमआयडीसी अग्निशामक दलाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालक यंत्रचालक राकेश बाबर, अग्निशमन विमोचक प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे, अजय साळुंखे तसेच अग्निशमन कर्मचारी कुणाल पाटील, अंकित पाटील आणि संकेत कुंभार यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य हाती घेतले.

ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. अखेर अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुरक्षितपणे केबिनमधून बाहेर काढण्यात यश आले. या बचावकार्यात अग्निशमन पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. घटनास्थळी उपलब्ध असलेल्या जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर महामार्गावरील वाहतुकीचा अडथळा दूर होऊन वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या अपघातामुळे कपडगाव येथील अवघड वळणावर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Total Visitors :
4810944
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *