रत्नागिरीत रेल्वे कॉलनीत घरफोडी; साडेआठ लाखांहून अधिक किमतीचे दागिने, रोकड लंपास

Gramin Varta
48 Views

रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सोन्याचे दागिने तसेच ७० हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शालिनी शंकर गंजे (५०, गृहिणी) या बहार बंगला क्रमांक ५, एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनी, एमआयडीसी मिरजोळे येथे वास्तव्यास आहेत. त्या ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून वैयक्तिक कामासाठी जळगाव येथे गेल्या होत्या. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्या रत्नागिरीला परतण्यासाठी रेल्वे प्रवासात असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वर्षा रवींद्र पाटील यांनी फोन करून घराचे कुलूप तुटले असून घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिली.

शालिनी गंजे या सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचल्या असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान विस्कटलेले आढळले. त्यानंतर त्यांनी कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता सोन्याचे विविध दागिने, रोख रक्कम तसेच अमेरिकन चलनातील ५४० डॉलर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्याच्या पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, राणीहार, ब्रेसलेट, लक्ष्मीहार, कानातील डुल व टॉप्स, सोन्याचे व डायमंडचे मंगळसूत्र तसेच ७० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून १४ मिनिटांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्याचा पोलिसांकडून शोध सुरू असून परिसरातील हालचाली आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4802280
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *