गणेशोत्सवासाठी रेल्वेचा मोठा दिलासा; ३४ अतिरिक्त विशेष गाड्या, पनवेल-चिपळूण ३० मेमू फेऱ्या

Gramin Varta
168 Views

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेकडून यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या विशेष रेल्वे सेवांमध्ये आता आणखी ३४ गणपती विशेष गाड्यांची भर पडली आहे. त्याचबरोबर पनवेल ते चिपळूणदरम्यान ३० अनारक्षित मेमू विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा देशभरातून सुमारे ३५० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले असून, प्रवाशांची मागणी आणि गर्दीचा आढावा घेऊन ही संख्या ३७० पर्यंत वाढवण्याची तयारी असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष रेल्वे सेवांचे नियोजन केले आहे.

गणेशोत्सव काळात प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने यापूर्वी २६२ गणपती विशेष ट्रेनच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये २०० आरक्षित विशेष गाड्यांचा समावेश असून सावंतवाडी रोडसाठी ११२, रत्नागिरीसाठी ६४ आणि मडगावसाठी २४ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वे सेवांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे.

नव्या निर्णयानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान चार आरक्षित विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या गाड्या १६ आणि १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना होतील आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी मडगाव येथे पोहोचतील.

कोकणातील प्रवाशांसाठी पनवेल-चिपळूण मार्गावर अनारक्षित मेमू सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. १० ते १४ सप्टेंबर तसेच १८ ते २७ सप्टेंबर या कालावधीत या विशेष मेमूच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. पनवेलहून ही मेमू दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि रात्री १० वाजून २० मिनिटांनी चिपळूणला पोहोचेल. चिपळूणहून परतीची सेवा सकाळी ९ वाजता रवाना होऊन दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. या विशेष सेवेचे आरक्षण ८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या गणपती विशेष रेल्वे नियोजनात एकूण २६२ फेऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये २०० आरक्षित विशेष गाड्यांसह ६२ अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. आरक्षित सेवांमध्ये वातानुकूलित गाड्यांसह वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य डब्यांची मिश्र रचना असलेल्या विशेष गाड्यांचाही समावेश आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकणातील विविध स्थानकांकडे या विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे मोठ्या संख्येने प्रवासी रवाना होत असताना अतिरिक्त रेल्वे सेवांमुळे नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, चाकरमान्यांचा गणेशोत्सव प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

Total Visitors :
4825664
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *