गणेशोत्सवासाठी कोकणात ५,२२० जादा एसटी धावणार; तीन लाखांहून अधिक बंद घरांचे कुलूप उघडणार

Gramin Varta
67 Views

विशेष प्रतिनिधी / मुंबई कोकणची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि सण जपणाऱ्या कोकणी माणसाचे गणेशोत्सवाशी अतूट नाते राहिले आहे. यंदा १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या लाडक्या सणासाठी मुंबईसह राज्यभरातून लाखो चाकरमानी गावाकडे दाखल होणार आहेत. या निमित्ताने वर्षभर बंद असणारी तीन लाखांपेक्षा जास्त घरे गणेशोत्सवात उघडली जाऊन संपूर्ण कोकण गजबजून उठणार आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने कंबर कसली असून, लालपरी सज्ज झाली आहे. एसटी महामंडळातर्फे यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ५,२२० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

गणेशोत्सवासाठी मुंबई विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी यंदाही लालपरीलाच पहिली पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले असून एकट्या मुंबई विभागातून १,९१७ बस आरक्षित झाल्याची माहिती मुंबईचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक १,३४७ बसचे आरक्षण परळ येथून झाले असून मुंबई सेंट्रल येथून २८४, कुर्ल्याहून २४३, पनवेलहून ३९ आणि उरण येथून ४ गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत.

गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकांतून या जादा गाड्या कोकणातील प्रत्येक गावासाठी सोडल्या जाणार आहेत. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी सर्व प्रमुख स्थानके तसेच थांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. ऐन गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी महामंडळाची विशेष वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.

Total Visitors :
4825684
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *