राजापूर (विशेष प्रतिनिधी) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयातून एका अल्पवयीन युवतीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची आणि त्याचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना राजापुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकावर पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर शहरात शिक्षणासाठी येत असलेल्या या अल्पवयीन युवतीची ओळख शहरातच शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाशी इन्स्टाग्रामवर झाली होती. काही दिवसांच्या या परिचयानंतर संबंधित युवकाने तिला आमिष दाखवून १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १२ या वेळेत कोदवली साईनगर परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करून या कृत्याचे मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. त्यानंतर संशयिताने हा व्हिडिओ आपल्या मित्राला ‘वन टाइम व्ह्यू’ मोडवर पाठवला. मात्र संबंधित मित्राने दुसऱ्या मोबाइलद्वारे त्याचे स्क्रीनिंग करून हा व्हिडिओ अन्य एका मित्राला फॉरवर्ड केल्याचे तपासात समोर आले.
हा व्हिडिओ अल्पवयीन मुलीच्या चुलत भावापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने याबाबत बहिणीकडे चौकशी केली असता घडलेला सर्व गंभीर प्रकार समोर आला. पीडितेने तत्काळ दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ६४, पोक्सो कलम ४, ८, १२, १४ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६७ (बी) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्हिडिओ पुढे प्रसारित करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून संबंधितांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. याशिवाय अल्पवयीन मुला-मुलीला प्रवेश देणाऱ्या संबंधित लॉज चालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.






