राजापूर ग्रामीण रुग्णालयात ऐतिहासिक कामगिरी; एकाच दिवशी तीन सिझेरियन प्रसुतींसह जटिल शस्त्रक्रिया यशस्वी

Gramin Varta
409 Views

राजापूर (तुषार पाचलकर): राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयाने वैद्यकीय सेवेत नवा मानदंड प्रस्थापित केला असून काल, ९ सप्टेंबर २०२६ रोजी रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवसात तब्बल तीन गुंतागुंतीच्या सिझेरियन सेक्शन प्रसुती यशस्वीरीत्या पार पाडल्या. यासोबतच एका महिलेवर गर्भपिशवी साफ करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली, तसेच २० गरोदर महिलांच्या सोनोग्राफी तपासण्याही एकाच दिवशी पूर्ण करण्यात आल्या. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी यशस्वी शस्त्रक्रिया पार पडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

या सर्व क्लिष्ट शस्त्रक्रिया व तपासण्यांमध्ये सर्जन तसेच सोनोलॉजिस्ट म्हणून राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी स्वतः धुरा सांभाळली, तर रत्नागिरी येथील डॉ. दत्तप्रसाद केतकर यांनी भूलतज्ज्ञ म्हणून जबाबदारी चोख पार पाडली. नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी बालरोग तज्ज्ञ डॉ. उमेश चव्हाण उपस्थित होते. डॉ. राम मेस्त्री यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण चमूने यासाठी अथक परिश्रम घेतले.

या महत्त्वपूर्ण मोहिमेत डॉ. आर्यन, डॉ. हर्षानी, डॉ. स्नेहल, डॉ. प्रसन्ना यांच्यासह स्टाफ नर्स बोरकर, लांजेकर, राठोड, महाडीक, चव्हाण तसेच ब्रदर नाटेकर, शिपाई प्रशांत, निशांत, चव्हाण आणि नाखरेकर माई या सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. ग्रामीण भागातील रुग्णांना तत्पर, अद्ययावत आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरवून राजापूर ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण टीमने केलेल्या या उल्लेखनीय कार्याचे सर्व स्तरातून विशेष कौतुक केले जात आहे.

Total Visitors :
4830856
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *