आईचे अवयवदान अन् श्री गांगोबा प्रतिष्ठानची १० लाखांची मदत; खेडमधील प्रणय महापदीची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

Gramin Varta
108 Views

देवरूख: दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जीवन-मरणाच्या दारात उभ्या असलेल्या खेड तालुक्यातील एका होतकरू महाविद्यालयीन तरुणाच्या मदतीला संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द माईनवाडी येथील श्री गांगोबा प्रतिष्ठान धावून आले आहे. बी.कॉम.च्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या कु. प्रणय प्रवीण महापदी (रा. पोसरे खुर्द, पंधरा गाव, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्या किचकट उपचारांसाठी प्रतिष्ठानने तब्बल १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत सामाजिक बांधीलकीचा एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्याचबरोबर स्वतःच्या आईनेच आपल्या काळजाच्या तुकड्याला किडनी दान करून त्याला जणू दुसरा जन्म दिल्याने या संपूर्ण संघर्षाला मातृप्रेमाची हळवी किनार लाभली आहे.

प्रणय याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. मात्र या शस्त्रक्रियेसाठी साधारण १० ते १२ लाख रुपयांचा प्रचंड खर्च अपेक्षित होता. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत एवढी मोठी रक्कम उभी करणे महापदी कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचे होते; अनेक ठिकाणी धावपळ करूनही अपेक्षित मार्ग निघत नव्हता. अशा अत्यंत आणीबाणीच्या क्षणी प्रणयचे वडील प्रवीण महापदी यांनी श्री गांगोबा प्रतिष्ठानशी संपर्क साधला. संकटाचे गांभीर्य ओळखून संस्थेचे अध्यक्ष कृष्णा माईन, सेक्रेटरी विजय मनोहर माईन, व्यवस्थापक विशाल कृष्णा माईन, प्रकाश सोमा माईन, संजय सीताराम माईन, खजिनदार प्रदीप सापते आणि सभासद वैभव माईन यांनी तातडीने मदतीची सूत्रे हाती घेतली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अपोलोच्या डॉक्टरांशी समन्वय साधला आणि विविध दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून अल्पावधीत तब्बल १० लाख रुपयांचा भरीव निधी गोळा करून थेट वडिलांच्या खात्यावर सुपूर्द केला.

निधीची व्यवस्था होताच, आई प्रणाली प्रवीण महापदी यांनी स्वतःची किडनी देऊन मुलाचे प्राण वाचवण्याचा धाडसी निर्णय घेतला. नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रणय व त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. संकटाच्या वादळात देवदूतासारखी धावून आलेली ही मदत आयुष्यभर विसरू शकत नाही, अशा शब्दांत महापदी कुटुंबीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले. यापूर्वी मार्च २०२६ मध्ये रायगड जिल्ह्यातील पाली-पडसरे येथील आदिवासी आश्रमशाळेतील ४०० विद्यार्थ्यांना सव्वा लाखांचे ब्लँकेट वाटप करणाऱ्या श्री गांगोबा प्रतिष्ठानने, आता एका होतकरू तरुणाचे प्राण वाचवून माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले असून या संवेदनशील कार्याचे संपूर्ण जिल्ह्यातून मनःपूर्वक कौतुक होत आहे.

Total Visitors :
4830812
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *