रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी मुख्य रस्त्याचे २४ कोटींतून होणार चौपदरीकरण

Gramin Varta
51 Views

रत्नागिरी: रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिरजोळे एमआयडीसी परिसरातील जे. के. फाईल्स ते गद्रे मरिनपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे रूपडे आता पूर्णपणे पालटणार असून, राष्ट्रीय महामार्गावरून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या या मार्गाचे थेट चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवजड वाहतूक आणि मुसळधार पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याच्या दुरवस्थेवरून स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून सातत्याने तक्रारी होत होत्या. केवळ तात्पुरती डागडुजी न करता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शासनाने सुमारे २४ कोटी रुपयांच्या भरीव निधीला मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यातील कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

सुमारे अठराशे मीटर लांबीच्या या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सध्या प्राथमिक पातळीवर रस्त्यालगतच्या पाण्याच्या जलवाहिन्या आणि विद्युत तारा स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळा पूर्णपणे संपल्यानंतर या प्रकल्पाच्या काँक्रिटीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला अधिक वेग दिला जाणार आहे. या चौपदरी मार्गाच्या दोन्ही बाजूंना सुसज्ज पदपथ आणि सांडपाण्याच्या गटारांची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच रस्ता अधिक आकर्षक व सुरक्षित व्हावा यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर शोभिवंत झाडांची लागवड आणि अत्याधुनिक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे.

हा मार्ग केवळ स्थानिक उद्योगांपुरताच मर्यादित नसून सामरिक व शैक्षणिक दृष्टीनेही अत्यंत कळीचा मानला जातो. जागतिक पातळीवर मत्स्य उत्पादनांची निर्यात करणाऱ्या गद्रे मरिनसह अनेक बड्या सागरी कंपन्यांची अवजड वाहतूक याच रस्त्यावरून २४ तास सुरू असते. याशिवाय भारतीय तटरक्षक दलाचे केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालय याच मार्गालगत स्थित आहेत. नव्याने विकसित होत असलेल्या रत्नागिरी विमानतळावरून शहरात दाखल होण्यासाठी अथवा महामार्गाच्या दिशेने बाहेर पडण्यासाठी हाच प्रमुख मार्ग ठरणार असल्याने, या रस्त्याचा कायापालट करून त्याला स्मार्ट लुक देण्यासाठी एमआयडीसी प्रशासन विशेष लक्ष घालत आहे. औद्योगिक क्षेत्रातील इतर ९० टक्के अंतर्गत रस्ते आधीच सुस्थितीत असल्याने, स्मार्ट सिटी आणि पर्यटनदृष्ट्या वेगाने विकसित होत असलेल्या रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणारा हा मुख्य मार्ग येत्या सात महिन्यांत म्हणजेच मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Total Visitors :
4836476
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *