गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून ५ हजारांहून अधिक जादा गाड्यांचे नियोजन; चाकरमान्यांसाठी २४ तास दुरुस्ती पथके तैनात

Gramin Varta
17 Views

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध भागांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात तब्बल ५ हजार २२० जादा एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यातील सुमारे ३ हजार २०० गाड्या रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहेत.

गुरुवारीपासून मुंबईतून कोकणाच्या दिशेने जादा गाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून येणाऱ्या सर्व गाड्या संबंधित आगारांमध्ये थांबविण्यात येणार असून, गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर या गाड्या परतीच्या प्रवासासाठी सोडण्यात येतील.

मुंबईकर मोठ्या संख्येने गावाकडे येणार असल्याने कोकणातील मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कशेडी ते खारेपाटण मार्गावर २४ तास दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. रस्त्यात एखादे वाहन बंद पडल्यास अथवा वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी क्रेन आणि ब्रेकडाउन वाहनेही उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. तसेच मार्ग तपासणी पथकांकडून जादा गाड्यांची नियमित तपासणी केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी सुमारे ५०० जादा गाड्या, तर शनिवारी १,२०० आणि रविवारी १,५०० जादा गाड्या दाखल होण्याचे नियोजन आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने स्थानिक बाजारपेठांमध्येही खरेदीसाठी मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठीही एसटीने नियोजन केले आहे. १९ सप्टेंबरपासून रत्नागिरी विभागातून २,५०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून, आतापर्यंत २,२०० जादा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ६०० ग्रुप बुकिंगच्या गाड्यांचा समावेश आहे. अनंत चतुर्दशी २५ सप्टेंबरला असल्याने २९ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी एसटीकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून, गावागावातून मागणीनुसार थेट बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी जवळच्या आगाराशी संपर्क साधून बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :
4840543
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *