रत्नागिरी : गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आपापसांत उत्तम समन्वय ठेवून दक्षतेने काम करावे, असे निर्देश उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या पूर्वतयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपविभागीय पोलीस अधिकारी आरांक्षा यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पोलीस विभागाने केलेल्या तयारीचे संगणकीय सादरीकरण केले. यंदा जिल्ह्यात १२७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तर सुमारे १ लाख ७० हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी घेण्यासाठी यंदा ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एसआरपीएफ, आरसीएफ तसेच स्ट्राइक टीम तैनात करण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
गणेशोत्सव काळात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. ग्रामीण रुग्णालये २४ तास कार्यरत ठेवून डॉक्टरांची उपस्थिती निश्चित करावी, तसेच मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा विचार करून रेल्वे स्थानके आणि प्रमुख थांब्यांवर आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात ठेवावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका क्षेत्रात कृत्रिम तलावांची निर्मिती करून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. चिपळूण येथे गणपती विसर्जनासाठी तात्पुरता विसर्जन घाट उभारून करण्यात आलेल्या व्यवस्थेबद्दल पालकमंत्री डॉ. सामंत यांनी समाधान व्यक्त केले.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. बहादूरशेख नाका येथे महामार्गावर विरुद्ध दिशेची अतिरिक्त लेन म्हणजेच रिव्हर्स लेन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी यासाठी क्रेन आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
गणपती विसर्जनाच्या दिवशी अवजड मालवाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जेएसडब्ल्यू आणि जेएनपीटी बंदरातून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून समन्वय साधण्यात आला.
दरम्यान, बैठकीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या प्रगतीचाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आढावा घेतला. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयाने आणि तत्परतेने काम करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Leave a Comment






