रत्नागिरी: रत्नागिरीच्या सांस्कृतिक वारशाची परंपरा जपणाऱ्या गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नुकतीच ‘वास्तविक अभिनय’ विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. २२ जून ते २७ जून या कालावधीत पार पडलेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्लीचे माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठातील थिएटर विभागाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद इनामदार यांनी विद्यार्थ्यांना अभिनयाचे बारकावे आणि सहज सोप्या अभिनयाची तंत्रे समजावून सांगितली.
महाविद्यालयाच्या परफॉर्मिंग आर्ट्स शाखेच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत अभिनयातील अतिरेक टाळून नैसर्गिक आणि प्रभावी अभिनय कसा करावा, यावर डॉ. इनामदार यांनी भर दिला. विद्यार्थ्यांची कल्पकता वाढवण्यासाठी त्यांनी विविध कृतीयुक्त उपक्रम (ॲक्टिव्हीटी) राबवले, ज्यांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास आणि विचार केल्यास त्यातील अभिनयाचे विविध पैलू कसे उमलतात, हेही त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी डॉ. इनामदार यांनी, रत्नागिरीतून भविष्यात अनेक दर्जेदार कलाकार घडावेत आणि येथील समृद्ध सांस्कृतिक वारसा अधिक वृद्धिंगत व्हावा, अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या.
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि परफॉर्मिंग आर्ट्सचे विभागप्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, समन्वयक डॉ. मीनल खांडके, प्रा. हरिश केळकर, प्रा. साई जिरोळे, प्रा. कश्मीरा सावंत, प्रा. ओंकार रसाळ आणि प्रा. रमा रानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञानाची मोलाची संधी उपलब्ध झाली, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
