आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत कडवईच्या डॉ. अभिराज नारकर यांचा डंका; मलेशियात मुंबई संघासह पटकावले विजेतेपद

Gramin Varta
96 Views

शास्त्रीपूल : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावचे सुपुत्र आणि दंतशल्य चिकित्सक डॉ. अभिराज नारकर यांनी मलेशिया येथे पार पडलेल्या हॉस्पेक्स आंतरराष्ट्रीय मेडिकल क्रिकेट स्पर्धेत आपल्या खेळाची मोहोर उमटवली आहे. मुंबईच्या मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाकडून खेळताना त्यांनी विजेतेपद पटकावत कडवई गावाचा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.

या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कतार, बांगलादेश, मलेशिया यांसारख्या देशांसह भारतातील मुंबई, दिल्ली, केरळ आणि गोवा अशा विविध नामवंत संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेडस्केप स्पार्टन्स युनायटेड संघाने गोवा संघाचा पराभव करत धडाकेबाज विजय संपादन केला. या विजयात डॉ. नारकर यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत मोलाची ठरली आहे.

गेली १७ वर्षे कडवई येथे दंतशल्य चिकित्सक म्हणून वैद्यकीय सेवा बजावत असतानाच डॉ. नारकर यांनी क्रिकेटमधील आपली आवड सातत्याने जोपासली आहे. टेनिस आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी आजवर अनेक स्तरांवर आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. याआधीही त्यांनी श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसह पाँडिचेरी, बेंगळुरू, विशाखापट्टणम, चेन्नई, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, हैदराबाद आणि नाशिक येथे झालेल्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.


आपला खडतर वैद्यकीय व्यवसाय सांभाळून खेळासाठी वेळ काढणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणे, हे कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल कडवईसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *