आंबा घाटात कोळशाने भरलेल्या १४ चाकी ट्रकला भीषण आग; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

Gramin Varta
206 Views

साखरपा / रमेश शिंदे: रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात शनिवारी पहाटे एक भीतीदायक घटना घडली. कोळशाने भरलेल्या १४ चाकी ट्रकला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण घाट परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांनी काही क्षणांतच ट्रकला वेढा घातल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, शंभू चरण यादव (वय ४८, रा. हजारीबाग, झारखंड) हे एमएच-०९-एफएल-९०४७ क्रमांकाच्या १४ चाकी ट्रकमधून तब्बल ३१ टन कोळसा घेऊन जयगडहून उंब्रज (जि. सातारा) येथे निघाले होते. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आंबा घाटातील गणेश मंदिराच्या पाठीमागे, रत्नागिरीच्या दिशेने सुमारे एक किलोमीटर अंतरावर ट्रक अचानक धगधगू लागला.

प्राथमिक माहितीनुसार, ट्रकच्या वायरिंगमध्ये ओव्हरहिटिंगमुळे शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या अंधारात अचानक उसळलेल्या आगीच्या प्रचंड ज्वाळा पाहून परिसरातील नागरिकही घाबरून गेले. काही काळासाठी महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, हातखंबा येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिपाली जाधव, पीएसआय पाटील, जीपीएसआय सावंत, पोलीस कर्मचारी वाकरे, लांबोरे, दाभाडे, संकपाळ, शिवलकर तसेच चालक कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल जाधव यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला.

याशिवाय, आंबा गावातील ‘मृत्युंजय दूत’ विजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी, देवरुख पोलीस आणि देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेतले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात यश आले.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *