ग्रामीण वार्ता इफेक्ट: बातमी प्रसिद्ध होताच महामार्गाच्या ठेकेदाराला जाग; तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने चर

Gramin Varta
388 Views

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या उक्षी फाटा परिसरात पावसाच्या पहिल्याच सरींत साचलेल्या ढोपरभर पाण्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल होत होते. या बिकट परिस्थितीबाबत ‘ग्रामीण वार्ता’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासकीय यंत्रणा आणि महामार्गाच्या ठेकेदाराला अखेर जाग आली आहे. बातमीचा त्वरित परिणाम म्हणून मंगळवारी तातडीने घटनास्थळी जेसीबी मशिन तैनात करण्यात आले आणि तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे उक्षी फाटा येथे पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला होता, तर काँक्रीटीकरण उखडल्याने कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. महामार्गावर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांवर चिखलाचा अभिषेक होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. ही गंभीर समस्या ‘ग्रामीण वार्ता’ने उचलून धरल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने तत्काळ दखल घेत पावसाच्या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी पावले उचलली आहेत. तरीही महामार्गावरील साचलेल्या चिखलाची स्वच्छता करून रस्ता सुरक्षित करावा आणि पावसाळ्याच्या काळात पाणी साचू नये म्हणून कायमस्वरूपी गटार व्यवस्था करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

Total Visitors :
4833918
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *